जेवणातील अतिरिक्त मिठाने वाचवला ११ जणांचा जीव   

घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होते कुटुंब

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा निष्पाप बळी गेला. यात उशिरा पोहचल्यामुळे काही जणांचे प्राण वाचले. त्यामध्ये केरळमधील एका कुटुंबातील ११ सदस्यांचा समावेश आहे. घटनास्थळापासून १५ मिनिटांवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये हे कुटुंब जेवणासाठी थांबले होते. त्यांनी फ्राईड राइस ऑर्डर केला होता. त्यामध्ये मीठ जास्त झाल्याने त्यांना बैसरणला पोहचण्यास उशीर झाला अन् हे कुटुंब दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. कन्नूर येथे राहणारी लावण्या ही कपड्यांचा व्यवसाय करते. तिने हा संपूर्ण प्रकार फेसबुकवर कथन केला आहे.
 
केरळमधील कन्नूर येथील हे कुटुंब १८ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये सुट्टीसाठी निघाले होते. ते १९ एप्रिल रोजी श्रीनगरला पोहोचले आणि दोन दिवस गुलमर्ग-सोनमर्गमध्ये फिरले. लावण्या यांनी सांगितले की, मंगळवारी त्यांच्या कुटुंबाने श्रीनगरपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगामला जाण्याची योजना आखली होती. मागील दोन दिवसांत जेवण व्यवस्थित मिळाले नव्हते. म्हणून बैसरणला जाताना तिच्या पतीने बैसरणपासून १५ मिनिट अंतरावर असलेल्या एका रेस्टॉरंटचा आग्रह धरला. त्यामुळे हे कुटुंब तिथे जेवणासाठी थांबले. 
 
रेस्टॉरंटमध्ये त्यांनी फ्राइड राइस ऑर्डर केला. काही वेळाने ती ऑर्डर आली. मात्र, त्यामध्ये मीठ जास्त होते. त्यामुळे रेस्टॉरंट चालकांनी दुसरा फ्राइड राइस बनवून दिला. त्यासाठी लावण्याच्या कुटुंबाला एक तास वाट पाहावी लागली. हा वेळ त्यांच्यासाठी जीव वाचवणारा ठरला. जेवणानंतर ते बैसरणजवळ येताच पर्यटक भीतीने पळत असल्याचे दिसले, पळापळ सुरू झाली. ते जोरजोराने ओरडत होते. केरळ कुटुंबीयांना त्यांची भाषा समजत नव्हती; पण ते सावध झाले. 
लावण्या आणि तिच्या पतीने एक गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या नागरिकांनी त्याला सांगितले की, दहशतवादी हल्ला झाला आहे. लावण्याच्या चालकाने त्यांना पुढे न जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे कुटुंब या हल्ल्यातून बचावले. 
 

Related Articles